पार्श्वभूमी

पीएमआरडीए अर्थात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, हे पुणे महानगर प्रदेशाच्या विकासाच्या सुसूत्र, नियोजनबध्द विकासाचा दृष्टीकोन आणि अधिकार असलेले वैधानिक प्राधिकरण आहे.

एक अग्रगण्य नागरी अधिवास म्हणून गेल्या तीस वर्षापासून पुणे शहराची वाटचाल सुरु आहे. विद्येचे माहेरघर म्हणून परिचित असलेल्या या शहराने आजवर अनेक व्यवसाय, उद्योगादी क्षेत्रांना जिल्हा – राज्य – देशाच्या सीमा ओलांडून परदेशात देखील कुशल आणि प्रतिभावान मनुष्यबळ पुरविले आहे. परिणामस्वरूप आजच्या घडीस एक प्रगत औद्योगिक केंद्र म्हणून आणि ‘प्रचंड जोमाने विकसित होणारे सर्वसमावेशक शहर’ म्हणून पुण्याची ओळख निर्माण झाली आहे.

पुणे परिसराच्या ह्या औद्योगिक क्रांतीमुळेच एक ‘विकासाचे प्रमुख केंद्र’ तसेच ‘गुंतवणुकीसाठी अत्यंत आकर्षक ठिकाण’ म्हणून आज पुणे परिसर ओळखला जातो आहे. नवीन बाजारपेठ, व्यवसाय विस्तार आणि भविष्यकालीन प्रगती यांसाठी जगभरातील अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या या प्रदेशाकडे आकर्षित होत असलेने गुंतवणूकदार आणि पुणे महानगर प्रदेश या दोहोंचाही यामधून फायदा सुनिश्चित आहे.

आनंददायी आरोग्यवर्धक वातावरण, नैसर्गिक साधनांची मुबलकता, समृध्द परंपरा, संस्कृती आणि सर्वात महत्वाचे म्हणजेच देशाची आर्थिक राजधानी मुंबई अगदी जवळ असणे – अशा अनेक अंगांनी पुणे परिसरास वरदान लाभले आहे. नवीन आणि अस्तित्वातील उद्योग वाढीस उत्तेजना देण्यासाठी हे अत्यंत महत्वाचे घटक आहेत.

पुणे शहर, मावळ, मुळशी, हवेली या तालुक्यांचा पुर्ण भाग तसेच भोर, दौंड, शिरूर, खेड, पुरंदर आणि वेल्हे या तालुक्यातील काही भाग पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या क्षेत्रामध्ये समाविष्ट आहे. महाराष्ट्र शासनातर्फे कायदेशीर अधिकार असलेली एक स्वायत्त आर्थिक ‘सार्वजनिक संस्था’ म्हणून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे गठन करणेत आले आहे. यातील बहुतांश प्रदेश हा हरीतविकास संकल्पनेमध्ये (ग्रीनफिल्ड डेव्हलपमेंट) समाविष्ट आहे. ही पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासाठी सर्वात मोठी संधी आहे.

रचना

क्षेत्रफळ ७३५६. ५१चौ. किलोमीटर
लोकसंख्या ७२. ९६लक्ष (अंदाजे)
समाविष्ट महानगरपालिकांची संख्या
समाविष्ट छावणी बोर्डसची संख्या
समाविष्ट नगरपरिषदांची संख्या
समाविष्ट गावे ८४२
जनगणना शहरे १२

पीएमआरडीए संबंध में - शाश्वत विकासाच्या दिशेने

शाश्वत विकासाची कल्पना प्रत्यक्षात आणणे हे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे स्वप्न आहे. पुणे महानगर प्रदेशामध्ये पारंपारिक विचारांऐवजी नाविन्यपूर्ण पद्धतीने नगरविकासाचा आराखडा करणेसाठी आणि दिशा देण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. सुसूत्र प्रगती आणि डीजीटल माहिती उपलब्धतेच्या भक्कम पायावर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील प्रत्येक समाविष्ट घटकाला अधिवास आणि व्यवसाय सुलभता, यासोबत सर्वोत्तम जीवनशैली उपभोगता यावी याकरिता प्राधिकरण कटिबद्ध आहे. एकविसाव्या शतकातील शहरीकरणाचे जागतिक आणि आदर्शवत उदाहरण साकार करण्याचा आमचा मानस आहे.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून साकार झालेले, भारताबरोबरच जागतिक अर्थकारणामध्ये आंतरदेशीय आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणुकदारांसाठी सर्वात जास्त किफायतशीर आणि आर्थिक विकासास चालना देणारे आदर्श क्षेत्र म्हणून पुणे महानगर प्रदेश विकसित होत आहे. प्रचलित शासनव्यवस्था, वर्धीतवेगाची सुयोग्य दिशा आणि नागरीकरणाचे काटेकोर आरेखन या सर्व पारंपारिक बाबींमधील आमुलाग्र सकारात्मक बदलाचे दयोतक म्हणजेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण होय!

पुणे महानगर प्रदेश हे देशातील एक प्रमुख आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्र व्हावे, या उद्दिष्टासाठी काम करणारे अनुभवी नियोजक आणि अंमलबजावणीमध्ये निष्णात तज्ज्ञ गटाच्या हाती याची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. पारदर्शक व समग्र आराखड्याच्या प्रक्रियेसह पद्धतशीर अंमलबजावणी यांवर आधारित, या क्षेत्राचे उज्ज्वल भविष्य हेही आमचे ध्येय आहे. कार्यक्षमता, एकात्मिकता आणि प्रभावी परिणामकारकता हा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यशक्तीचा गाभा आहे.

पुणे महानगर प्रदेशामध्ये डिजिटल पद्धतीची नियामक प्रणाली राबवून व्यवसाय सुलभतेमध्ये वाढ करण्याचेही आमचे ध्येय आहे. यामुळे ‘एक खिडकी योजना’ निव्वळ संकल्पना न रहाता त्यामध्ये कमालीची विश्वासार्हता अंगीकारण्यात आली आहे व त्याद्वारे गुंतवणूकदारही प्रोत्साहित होतील. एकविसाव्या शतकामध्ये शाश्वत विकास साधण्यासाठी शासनव्यवस्थेची पातळी डिजिटल युगानुरूप उंचावणे, तसेच सक्षम होतकरू गुंतवणूकदारांना अधिक व्यवसाय सुलभता मिळावी अशा रीतीनेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामधील सर्व प्रणालींची आखणी करण्यात आली आहे.

माहिती तंत्रज्ञानाच्या युगास अनुकूल अशी नगरविकास आणि शासनव्यवस्थेमध्ये सुधारणा करणेसाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत सर्व कायदेशीर आणि नियामक प्रक्रिया इलेक्ट्रोनिक आणि डिजिटल माध्यमांद्वारा एकत्रित करण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. नागरिकांचे आरोग्य तथा जीवनशैली निर्देशांक जगामध्ये सर्वोच्च असावा, यासाठी सर्व सहभागधारकांना माहिती उपलब्ध होऊन त्याची हाताळणी सहज व्हावी, यासाठी प्राधिकरण कार्यशील राहणार आहे. भविष्याचा वेध घेऊन आदर्श व कार्यक्षम ऊर्जा वापराची पर्यावरणपूरक यंत्रणा विकसित करणार आहोत.

पीएमआरडीए सीमा

भारत

Maharashtra Area

महाराष्ट्र राज्य

Pune Region

पुणे जिल्हा

PMRDA Boundary

पीएमआरडीए प्रदेश

PMRDA Boundary