समाजासाठी हरित आणि शाश्वत विकास घडवून आणणे

पुणे महानगर क्षेत्रामध्ये होणा-या आर्थिक भरभराटीचा पर्यावरणावर अनिष्ट परिणाम होऊ नये याकरीता पायाभूत सुविधा आणि आर्थिक वृद्धी विभागामार्फत भर दिला जाईल. हरित विकास साध्य करण्यासाठी सर्वोत्तम अशा उद्योग प्रकल्प व्यवस्थापन आणि प्रकल्प अभियांत्रिकी पद्धतीस उत्तेजन देण्यात येईल. पुणे महानगर प्रदेशात सर्व प्रकारच्या विकासाप्रती पायाभूत सुविधा नियोजीतरित्या तयार करण्यासाठी हा विभाग अग्रक्रमाने प्राधान्य देईल.

शाश्वत संसाधनांचा वापर आणि त्याच्या जोडीने किमान कार्बन फुटप्रिंट निर्माण होणे यावर विभाग लक्ष केंद्रित करेल. विकासाच्या या प्रक्रियेमध्ये समाजातील दुर्लक्षित विभाग जसे कि, दिव्यांग कामगार शक्तीचाही समावेश करण्यात येईल. सद्य:स्थितीतल्या विविध प्रकल्पांमुळे नियोजित विकासाला बाधा पोहोचणार नाही याची दक्षता घेणेत येईल.

पायाभूत सुविधांच्या वर्धित विकासामुळे रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होऊन समाजाच्या आर्थिक उन्नतीला उत्तेजन मिळेल. त्यामुळे नवीन व्यावसायिकसंधी निर्माण होतील. तसेच स्थानिक खाजगी तसेच परकीय गुंतवणूकदार आकर्षित होतील.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे पायाभूत सुविधांचे धोरण

खासगी संस्था तथा विकसकांच्या सहभागासाठी, त्यांना प्रेरित करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पायाभूत सुविधा धोरण तयार केले आहे. दि. १७ मार्च, २०१६ पासून या धोरणाची अंमलबजावणी सुरु केली आहे. या धोरणामुळे प्राधिकरणास पुणे महानगर क्षेत्रामध्ये पायाभूत सुविधांचे उद्दिष्ट साधण्यासाठी मदत होणार असून त्यामुळे शाश्वत विकास साधला जाणार आहे. या धोरणांतर्गत वाहतुकीची कोंडी सोडविणाऱ्या, वाहतुकीच्या परिस्थितीमध्ये सुधारणा करणाऱ्या जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना प्रोत्साहन दिले जाईल.

रस्ते, उड्डाणपूल, नदीवरील पूल, पाणीपुरवठा योजना, जलनिस्सारण योजना, सांडपाणी योजना, घनकचरा व्यवस्थापन योजना आणि इतर सार्वजनिक पायाभूत सुविधा आदी प्रकल्पांचा यात प्रामुख्याने समावेश असेल. जास्तीत जास्त नैसर्गिक साधनांचा पुनर्वापर करता येण्याजोग्या संसाधनाद्वारे ऊर्जानिर्मिती करून त्याद्वारे पर्यावरणावर पडणारा ताण कमीत कमी ठेवणे हा या धोरणाचा केंद्रबिंदू राहणार आहे.

सर्वसमावेशक पायाभूत सुविधांचा विकास

संस्कृती, वारसा आणि मनोरंजनाच्या उद्देशाने येणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरेल अशा रीतीने पुणे महानगर प्रदेशाचा विकास घडविणे हे पायाभूत सुविधा आणि आर्थिक वृद्धी विभागाचे प्रमुख साध्य असेल. त्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाद्वारे खालील प्रकारच्या सुविधा पुरविणाऱ्या नागरी वसाहती निर्मिल्या जातील -

सर्वोत्तम शिक्षण संस्था.
सर्वोत्तम रोजगाराच्या संधी.
सर्वोत्तम मनोरंजनाच्या सुविधा.
सर्वोत्तम खरेदीसाठी नानाविध पर्याय.
सर्वोत्तम श्रमपरीहारासाठीचे उपक्रम.

सुनियोजित आणि सुसूत्र विकास राखून त्यायोगे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाद्वारे समाजातील सर्वात तळागाळाच्या स्तरापासून ते सर्वोच्च स्तरांतील प्रत्येक नागरिकांच्या गरजांची पुर्ती होईल, याकडे विशेष लक्ष देण्यात येईल.

ई-मेल फोन नंबर व्हाट्स अँप नंबर
ce.pmrda-mh@gov.in ९०११०५३१११ ९०११०५३१११